महाविकास आघाडीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Foto
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत हा मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला सुद्धा सोबत घेणे, अशी  स्वत: राज ठाकरेंची इच्छा आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण याचा अर्थ हा निर्णय नाही. कारण प्रत्येकाचे  या राज्यात स्थान आहे. शिवसेनेचे आहे, डाव्या पक्षाचे स्थान आहे, तसेच काँग्रेसचेही स्थान आहे, असे विधान खासदार राऊतांनी केले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
 
राज्यात काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक हे दोन्ही नेते एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, या पार्श्‍वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवतील का, यावरही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी रविवारी सहकुटुंब मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या तीन महिन्यांतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही सहावी भेट होती. त्यामुळे मनसे आणि शिवसेना (ठाकरे) युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याबाबत एक मोठे विधान केले आहे. राज ठाकरे यांची महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील बरोबर घेण्याची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच राज ठाकरे यांची ही भूमिका आहे, पण अद्याप निर्णय नाही, असेही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

दरम्यान महाविकास आघाडीत नवा भिडू नको अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली आहे, आज बैठक देखील आहे. मग मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? तसेच हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणे आहे की मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं असेल तर तो निर्णय दिल्लीत होईल, असा प्रश्‍न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांचे म्हणणं बरोबर आहे. आम्ही दिल्लीत चर्चा करत आहोत, आमची काही चर्चा झालेली आहे. उद्धव ठाकरे हे मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींशी देखील चर्चा करतील.

राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक?

महाविकास आघाडीत येण्यासाठी राज ठाकरे इच्छुक आहेत का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत जर एखादा नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असे माझे म्हणणे आहे. काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे, काँग्रेसच्या येथील नेतृत्वाला मोठा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केले पाहिजे. त्यामुळे ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीत निर्णय घेतील, त्यानंतर आम्ही सर्व महाराष्ट्रात आहोत आम्ही येथे निर्णय घेऊ, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंची ही भूमिका, पण निर्णय नाही....

राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत का? असा पुन्हा एकदा प्रश्‍न पत्रकारांनी राऊतांना विचारला. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो. स्वत: राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील बरोबर घेणे गरजेचे आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण त्यांचा (राज ठाकरे यांचा) हा निर्णय नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.